थोर समाजसुधारक संत गाडगे बाबा पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन. संत गाडगे महाराज ज्यांना देबूजी झिंगराजी जानोरकर म्हणूनही ओळखले जाते. हे महाराष्ट्रातील थोर संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार होते. २३ फेब्रुवारी १८७६ रोजी शेंडगाव या गावात जन्मलेल्या गाडगे महाराजांनी आपले जीवन समाजातील अंधश्रद्धा, अस्पृश्यता आणि अस्वच्छता दूर करण्यासाठी समर्पित केले.
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला.
संत गाडगे महाराज त्यांच्या अध्यात्मिक दृष्टिकोनासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी धार्मिक कर्मकांडांपेक्षा समाजसेवेवर भर दिला. ते साध्या वेशात असत. एका हातात झाडू आणि एका हातात फुटके गाडगे घेऊन फिरणारे गाडगे महाराज म्हणजे स्वच्छतेचे आणि साधेपणाचे प्रतीक होते. त्यामुळेच लोक त्यांना “गाडगेबाबा” म्हणू लागले. त्यांच्या शिकवणींमध्ये समानता आणि मानवतेचा संदेश होता.
देव दगडात नसून तो माणसांत आहे.
गाडगे महाराजांनी जातिभेद, अस्पृश्यता आणि अंधश्रद्धेचा प्रखर विरोध केला. शिक्षण, समानता, आणि विवेकवादाचा प्रसार करणे, हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन यावर त्यांनी भर दिला. त्यांनी अनेक धर्मशाळा, शाळा आणि रुग्णालये उभारली, ज्यामुळे गरिबांना मदतीचा आधार मिळाला. त्यांच्या निस्वार्थ सेवेने समाजातील सर्व स्तरांवर त्यांना आदर मिळवून दिला.
मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही
संत गाडगे महाराजांचे २० डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून “संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान” सुरू केले.
सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात.
संत गाडगे महाराजांची शिकवण आणि त्यांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांचे जीवन आजही आपल्या समाजासाठी आपली जबाबदारी आणि श्रमाची प्रतिष्ठा ओळखण्याची शिकवण देते. त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहताना, आपण त्यांच्या मूल्यांचे पालन करू आणि स्वच्छ, समतोल आणि सहिष्णू समाजासाठी प्रयत्न करू.
तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी